Our new initiatives: 'कुतुहल' | असे कां आणि कसे? | Home | About us | Contact us | youtube

Vidnyanvahini

मुंग्यांचे जग

7 Feb. 2022 •

मुग्यांवर अमेरिकेत झालेल्या संशोधनात असे आढळून आले की पृथ्वीवर माणूस येण्याआधी सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वीच डायनॉसॉर नष्ट झाले. मात्र आश्चर्य म्हणजे डायनॉसॉरच्याच काळात असणारी किटकाची एक जात आजच्या काळातही टिकून आहे. हा किटक म्हणजे मुंगी!

ह्या जगात सततचे बर्फाळ प्रदेश सोडून बाकी जगभरात मुंग्या आढळतात आणि त्यांच्या सुमारे 12,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीच्या गुणधर्मात काही-काही वेगळेपणा आढळतो.

घरात आपल्याला मुंग्या दिसल्या आणि त्यातही लाल मुंग्या दिसल्या की लगेच आपण त्यांचा माग काढतो, त्यांना घालवण्यासाठी पावडर टाकतो आणि त्या नाहीशा होईपर्यंत त्यांच्या मागावर रहातो. मात्र, अभ्यासासाठी मुंग्या जोपासणारे जगात अनेकजण असतात आणि ते चक्क ’प्रेमाने’ मुंग्यांचं निरिक्षण करत असतात.

अर्थात त्यांच्या अशा अभ्यासामुळेच मुंगी ह्या किटकाबद्दल आपल्याला खूप आणि वैशिष्ठ्यपूर्ण माहिती मिळू शकते. त्यापैकी थोडीफार माहिती आपण आता जाणून घेऊया.

मुंग्या जात्या ’सोशल’ म्हणजे एकत्र रहाणाऱ्या असतात, त्यांची भली मोठी वारूळे असतात आणि प्रजातींनुसार लाखावारीच्या संख्येने वारूळात त्या एकत्र रहातात. वारूळांमधे तीन प्रकारच्या मुंग्या असतात. राणी मुंगी, स्त्री-कामगार व सैनिकी मुंग्या आणि काही प्रजोत्पत्ती पुरूष-मुंग्या. राणी मुंगीला व प्रजोत्पत्ती मुंग्यांना पंख असतात.

अंडी फक्त राणी मुंगीच घालू शकते. अंडी घालण्याआधी तिचे पंख झडतात. ती सुरक्षित ठिकाणी म्हणजे जमिनीखाली खोलवर असलेल्या वारूळांमधे लाखो अंडी घालत रहाते. आणि राणीचे फक्त तेच काम असते. वारूळात सहसा एक राणी मुंगी असते आणि अनुकुल परिस्थितीमधे राणी मुंगी बरीच म्हणजे तीस-एक वर्षे जगू शकते. भल्या मोठ्या वारूळांमधे एकापेक्षा जास्त राण्या असू शकतात.

कामगार आणि संरक्षक मुंग्या ह्यांची मुख्य कामे अन्न मिळवणे, वारूळाची काळजी घेणे, राणी मुंगीचे रक्षण करणे ही असतात. तसेच ह्या मुंग्या शत्रू मुग्यांवर हल्ला करून तेथील अन्न, जागा आणि अंडी काबीज करतात व अंडयातून आलेल्या मुंग्याना गुलाम बनवतात!

कामगार मुंग्या साधारण 1.6 ते 6 mm लांबीच्या असतात, राणी मुंग्या कामगार मुग्यांपेक्षा 2 ते 4 पट मोठ्या असतात (चित्र 1). पुरूष-मुग्यांना काही कामे नसतात, ह्या मुंग्या त्यांचे प्रजोत्पत्तीचे कार्य संपल्यावर साधारण तीन-चार आठवड्यात मरतात.

चित्र 1 - राणी मुंगी आणि कामगार मुंग्या

मुंग्या झोपतात का? होय, त्या झोपतात. साधारणपणे 12 तासात आठ मिनीटे झोपतात. राणी मुंगी मात्र बरीच झोपते.

सर्वसाधारणपणे मुंगीचे शरीर तीन भागात असते (चित्र 2). ते म्हणजे डोके, धड (Thorax), पोट (Abdomen). डोक्याकडील भागावर डोळे, ॲन्टीना व छोट्या मिशा (Mandible) असतात. ह्या मिशा पाने कापण्यासाठी, भक्ष पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठीही उपयोगाला येतात.

डोळ्यांच्या मोठ्या केलेल्या फोटोमधे डोक्याच्या बाजूस असलेले दोने मोठे काळपट डोळे हे अनेक बारीक-बारीक भिंगे एकत्र जोडल्यासारखे असतात, त्यामुळे त्यांना अनेक बाजूंकडचे दिसत असते. शिवाय मुग्यांच्या डोक्यावरच्या तीन साध्या डोळ्यांमुळे त्यांना अंधुक प्रकाशात आणि वेगळ्या तरंगलांबींच्या प्रकाशातही दिसू शकते.

मुंग्यांना कान नसतात. त्यांच्या सहा पायांच्या गुडघ्याखालील अवयवांद्वारे आणि पावलांना जाणवणारी कंपने ह्यामुळे त्यांचे कानाचे काम होते. कंपंनांद्वारे मुग्यांना धोक्याची सूचनाही कळते.

मुंग्यांना नाक नसते. पण डोक्यावरच्या ॲन्टीनाचा उपयोग अन्नाचा व इतर मुंग्याचा मागोवा घेण्यासाठी आणि भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेणे ह्यासाठी होतो.

मुंग्यांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी फुफुसे नसतात, त्यांच्या शरीरावर असणाऱ्या छिद्रांमधून ऑक्सिजन शरीरात घेतला जातो व कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर सोडला जातो.

मुंग्यांना दोन पोटे असतात. त्या हावरट असतात म्हणून नाही बरं का!. एक पोट त्यांच्या स्वत:साठीचे अन्न साठवायला असते. आणि दुसऱ्या पोटातले अन्न बाकीच्या अशा मुंग्यांना वाटण्यासाठी की ज्या राणीची आणि वारूळाची कामे करायला मागे थांबल्या आहेत.

मुंग्यांची आणखी काही वैशिष्ठ्ये:

मुंग्या स्वत:च्या वजनाच्या 20 ते 50 पट वजन उचलू शकतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखादा 5 वी, 6 वीतला मुलगा मुंगीएवढा शक्तीमान असता तर तो मोटर गाडी उचलू शकला असता!

राणी मुंगी बरेच वर्ष जगू शकते. त्यामुळे तिची लाखो ’मुंगीबाळं’ असू शकतात.

वारूळाची राणी मुंगी जर मेली तर ते वारूळ थोडे महीनेच टिकते. कारण सहसा राणीची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि राणी व्यतिरीक्त इतर मुंग्याना ’बाळे’ होऊ शकत नाहीत.

आपण जसा धान्यांचा थोडाफार साठा घरात ठेवतो त्याप्रमाणे मुंग्याही वारूळात अन्न साठवतात.

मुंग्यामधे होणाऱ्या ’लढाया’ या मरणांनीच निकाली होतात.

वारूळाबाहेर जाताना मुंग्या एकप्रकारचा वास सोडत जातात, त्यामुळे त्यांना परतीचा मार्ग कळतो. 

मग, ही माहिती वाचून कष्टाळू मुंग्यां विषयी तुमचे मत थोडेफार बदलले ना!



All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.