Our new initiatives: 'कुतुहल' | असे कां आणि कसे? | Home | About us | Contact us | youtube

Vidnyanvahini

वृक्ष वाचवा

21 Oct. 2021 •

मुलांनो हल्ली जी अफाट वृक्षतोड होते आहे, ती होण्याचं एखाद प्रमुख कारण तुम्हाला माहिती आहे का? या वृक्षतोडीचे कारण समजल्यावर तुम्हाला आपल्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल करावासा वाटेल. वृक्षतोडीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कागद बनवणं.

deforestation

सुमारे 30% टक्के वृक्षतोड ही केवळ ह्याच कारणासाठी होत असते. कागद हा प्रामुख्यानं पाम किंवा निलगिरीच्या झाडापासून बनवला जातो. एका झाडापासून A4 आकाराचे सुमारे 500 कागद तयार होतात. पण हे पामचं झाड 8.5’ फुट उंच आणि फुटभर जाड वाढण्यासाठी मात्र जवळ जवळ 6 वर्षे लागतात. त्यातूनही झाडाचा जेमतेम 6% भाग यासाठी वापरला जातो. उर्वरित कचरा वाया जातो. शिवाय या प्रक्रियेसाठी पाणी पण भरपूर लागतं.

म्हणूनच तर आता “Paperless documentation” ही संकल्पना पुढे येते आहे. लिखाणासाठी वापरला जाणारा कागद सोडला, तरी टिश्यू पेपर आहेच ना? आणि हा बनलेला टिश्यूपेपर बघा आपण केवळ एकदाच वापरतो आणि वापरून झाला की लगेच फेकून पण देतो. होय! तोच तो टिश्यू पेपर जो आपण साफसफाई करण्यासाठी, पुसण्यासाठी वापरतो आणि तो नुसता वापरतो तो असं ही नाही, भरपूर वापरतो आणि आपण तो वाया पण खूप घालवतो. विशेषत: हॉटेलात! अशाप्रकारे टिश्यू पेपर वापरायची आपल्याला खूप सवयदेखील जडलेली आहे. पूर्वीच्या काळी कागद हा मृत झाडापासून म्हणजे वठलेल्या झाडांपासून बनवला जायचा. पण जसजशा आपल्या गरजा वाढत गेल्या तसतशी ही वृक्षतोड ... तोड कुठली कत्तलच म्हणायची, वाढत गेली. टिश्यू पेपर कसा मऊ व मुलायम हवा.

wasting paper
tissue paper

..अजून मुलायम ..अजून मुलायम. त्यामुळे कागदाचा पुनर्वापर करण्याऐवजी जास्तीत जास्त वृक्षतोड व्हायला लागली. कारण मुलायम टिश्यू पेपर हा नुकत्याच कापलेल्या झाडांपासून बनवला जातो. तुम्हाला माहिती आहे का की टिश्यू पेपर बनवण्यासाठी किती झाडं तोडली जातात? दररोज सुमारे 27000 झाडं तोडली जातात. कशासाठी? तर केवळ टिश्यू पेपर बनवण्यासाठी! म्हणजे कल्पना करा 27000 गुणिले वर्षाचे 365 दिवस म्हणजे 9855000, म्हणजे वर्षाला सुमारे एक कोटी झाडं आपण तोडतो. आश्चर्य वाटलं ना हे ऐकून?

थोडं थांबा ! अजून दुसरी धक्कादायक बातमी तुम्ही अजून ऐकली नाहीत. आपण ही वृक्षतोड जर याच वेगाने चालू ठेवली तर आपलंच भवितव्य धोक्यात येईल. आपलं जगणं अवघड होईल आणि हा काळ फार लांब नाही बरका! नजीकच्या 100 वर्षांतच! फार चिंताजनक परिस्थिती आहे ना? होय! त्यासाठीच तर आपल्याला स्वतःमध्ये फार एक फार मोठा बदल करायला हवा. पण तुम्ही म्हणाल की टिश्यूच्या ऐवजी मग काय वापरायचं? बरोबर! त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात असे काही बदल घडवायला हवेत, अशा काही सुधारणा करायला हव्यात ज्यामुळे कैक हजार वृक्ष कमी तोडले जातील. मी स्वतःच मागच्या महिन्यात एक प्रयोग करून बघितला. आणि खरं सांगतो मित्रांनो! विश्वास ठेवा! हे अजिबात अवघड नाही.

बदल क्रमांक 1 - नेहमी तुमच्या खिशामध्ये एक हातरुमाल ठेवा. तुम्ही खिशामध्ये मोबाईल ठेऊ शकता, मग हातरुमाल का नाही ठेवू शकणार?

बदल क्रमांक 2 - तीन चार टॉवेल म्हणजे नॅपकिन विकत घ्या. आणि तुम्ही जे नेहमी टिशू पेपर वापरता त्याच्याजागी हे नॅपकिन ठेवा. उदाहरणार्थ तुमच्या कारमध्ये, ऑफिसमध्ये, पर्समध्ये वगैरे.

बदल क्रमांक 3 - जेव्हा अगदीच गरज असेल, दुसरा पर्यायच नाही, तेव्हाच फक्त टिश्यू पेपर वापरा आणि तितक्याच कार्यक्षमतेने शक्यतो चार टिश्यू पेपरच्या ऐवजी एकवरच भागवा.

बदल क्रमांक 4 - कुठेही गेलात तर आधी हात धुण्यासाठी जागा कुठे आहे? ते शोधा. तसंही हे टिश्यू वापरण्याची प्रथा फार जुनी नाही. या गेल्या 10 – 15 वर्षांतलीच आहे. मला आठवतंय पूर्वी आपण नेहमी जेवणाआधी आणि जेवल्यानंतर हात धुवायचोच. आता तुम्ही म्हणाल की मग या पध्दतींमध्ये पाणी नाही का वाया जाणार? पण टिश्यू पेपरचा एक गठ्ठा बनवण्यासाठी कागदाच्या कारखान्यात 168 लिटर पाणी वापरलं जातं. 168 लिटर पाणी आणि वृक्षतोड!

cloth napkin and handkerchief
wash hands with water

आता तुम्हीच ठरवा यातले योग्य काय आहे? चला तर मग आपण शपथ घेऊया की वर सांगितलेले 4 बदल आपण अंगिकारुया आणि ही महत्त्वाची माहिती आणखी चार लोकांना सांगू या आणि ही वृक्षतोड आपण नक्कीच थांबवूया!

तुम्ही “चिपको ” आंदोलना विषयी ऐकलं असेलच!

हे आंदोलन 1973 साली तत्कालीन उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यात सुरू झालं. झाडे तोडण्याच्या निषेधार्थ भारतातील उत्तराखंड (तत्कालीन उत्तर प्रदेशचा भाग) मधील शेतकऱ्यांनी हे केलं. ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं सुंदरलाल बहुगुणा यांनी. चिपको ही एक पर्यावरण संरक्षण चळवळ होती. ते शेतकरी राज्य वन विभागाच्या कंत्राटदारांकडून होणाऱ्या जंगलतोडीला विरोध करत होते आणि त्यांच्यावर त्यांचे पारंपारिक हक्क सांगत होते. एका दशकात ते संपूर्ण उत्तराखंड प्रदेशात पसरलं होतं.

Sundarlal Bahuguna

सुंदरलाल बहुगुणा

चिपको चळवळीचं एक वैशिष्ट्य असं होतं की यात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या. चिपको चळवळ ही जंगलांची अव्यवहार्य कत्तल थांबवण्यासाठी आणि जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी होती. रेनी गावातील 27 स्त्रियांनी त्यांचे प्राण पणाला लावून ते यशस्वी केलं.

women in Chipko andolan

आंदोलन कोणत्याही कारणाने असो, वृक्षतोड थांबवणे महत्वाचे.



All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.