नमस्कार मुलांनो आणि शिक्षक बंधू-भगिनींनो,
आम्ही 'कुतुहल' हे नविन सदर सुरू करत आहोत. कुठल्याही कुतुहलामुळे 'असे का' असा प्रश्न आपल्या मनात येतो. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण 'कसे' ह्या क्रियेकडे वळतो. होय ना?
...
तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेतील एक बातमी ऐकली. ती बातमी अशी की, टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठी पुरस्काराची घोषणा केली. टाईमच्या 'किड ऑफ द इयर' चा पहिला पुरस्कार पंधरा वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीला 'टॉप यंग सायन्टीस्ट' म्हणून मिळाला.
ही बातमी वाचून मनात आले की, विज्ञानवाहिनी विविध शाळांमधे जात असते. तिथेही आम्हाला सायन्स प्रोजेक्टमधे भाग घेणारे, बक्षिस मिळवणारे अनेक विद्यार्थी-विद्यार्थी भेटतात! असो.
मुलांनो, विषय कुठलाही असो. महत्व असते ते आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल कुतुहल जागे होणे आणि त्याचे उत्तर सापडेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे! ह्यालाच संशोधन म्हणले जाते. अशा संशोधनांमुळे आज जगात अनेक क्षेत्रात किती प्रगती झाली आहे हे तुम्हाला माहित आहे.
विद्यार्थ्यांनी कुतुहलाने अगदी साध्या-साध्या प्रश्नातून सुरवात करावी, मिळेल तिथून माहिती काढावी आणि आपले शंकानिरसन होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरवावा.
आपल्या अवतीभोवतीचा निसर्ग असो, रोजच्या जीवनातल्या गोष्टी असो. ह्यांच्याविषयी विचार करत राहिल्यास आपल्याला अनेक प्रश्न पडतात. तुमच्या अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाटल्यास शिक्षकांची मदत घ्या. आम्हाला विचारा, आम्हीही त्याबद्दल विचार करू.
म्हणजे कुतुहलातून विचार, विचारातून प्रश्न, प्रश्नांतून उत्तरे अशा प्रकारे प्रगतीकडे जाऊया.